पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज दिल्लीत भेट घेणार होत्या. मात्र काही कारणाने ते भेटू शकले नाहीत. यामुळे दोघांमध्ये फोनवर चर्चा झाली. सध्या ममता बॅनर्जी राजधानीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एक नवा नारा दिल्याचे समोर आले आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत की, लोकशाही पुढे गेली पाहिजे. लोकशाही वाचवा, देश वाचवा हा आमचा नारा आहे.
याआधी ममता बॅनर्जी यांनी '१० जनपथ' येथे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी देखील उपस्थित होते. सोनिया गांधींच्या निवासस्थानी जवळपास तासभर त्यांच्यात चर्चा झाली. त्याआधी मंगळवारी ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. बैठकीनंतर सौजन्य भेट असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
नरेंद्र मोदींविरोधात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोट बांधण्यासाठी ममतांचा हा दौरा असून तो महत्त्वपूर्ण मानला जात आहे. तृणमूल काँग्रेसच्या मुखपत्रातही 'एबार शपथ, चलो दिल्ली' याबाबतची घोषणा देण्यात आली आहे.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी शरद पवारांशी बोलले. हा दौरा यशस्वी झाला आहे. आम्ही राजकीय हेतूसाठी भेटलो होतो. लोकशाही पुढे गेली पाहिजे. आमचा नारा 'लोकशाही वाचवा, देश वाचवा'. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांना पाठिंबा देतोय. आम्ही दर दोन महिन्यांनी इथे येत राहू.