मुंबई : महावितरणचे कर्मचारी खासगीकरणाविरोधात आक्रमक झाले आहेत. खासगीकरणाला विरोधासह इतर मागण्यांसाठी आज रात्री 12 वाजेपासून 72 तासांच्या संपाची हाक कर्मचाऱ्यांनी दिली आहे. यामुळे उद्यापासून राज्यभरातील वीज यंत्रणा कोलमडण्याची चिन्हे आहेत. शिंदे-फडणवीस सरकार या संपाची दखल घेणार की महाराष्ट्र अंधारात जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अदाणी इलेक्ट्रिकल लिमिटेड नवी मुंबई या खाजगी भांडवलदार कंपनीने विद्युत नियामक आयोगाकडे परवाना मागितला आहे. त्याला महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी संघर्ष समितीने विरोध केला आहे. अदानी इलेक्ट्रिकल कंपनीस वितरणाचा परवाना देऊ नये, राज्य सरकारने वीज कंपनीचे खाजगीकरणाचे धोरण रद्द करावे, या मागणीसाठी संघटनेने 72 तासाच्या संपाची हाक दिली आहे.
राज्यभरातील वीज वितरण कंपनी कर्मचारी मोठ्या संख्येने एकवटले असून आंदोलन करणार आहेत. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेनेही उडी घेतली असून तेही संपात सहभागी होणार आहे. तब्बल 31 संघटना कृती समितीच्या माध्यामातून संपात सहभागी होणार आहे. यामुळे उद्यापासून राज्यभरातील वीज यंत्रणा कोलमडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
महावितरण कर्मचाऱ्यांकडून तीन दिवसीय राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. महावितरणचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आज 3 जानेवारी रोजी मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. गरज पडल्यास हा राज्यव्यापी संप तीन दिवसांनंतरही सुरु ठेऊ, अशी भूमिका माहावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. तर, तीन दिवसीय राज्यव्यापी संपामुळे राज्यातील भागांत तांत्रिक बिघाड झाल्यास मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.