राज्यातील सत्तासंघर्षाच्या नाट्यानंतर आता त्याचे पडसाद क्रीडा क्षेत्रात देखील उमटताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar ) अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांना एकच धक्का बसला आहे. भारतीय कुस्ती महासंघाने हा निर्णय घेता असून या संघटनेचे अध्यक्ष भाजपचे खासदार बृजभूषण आहेत. महासंघाच्या सुचनांनुसार 15 आणि 23 वयोगटातील कुस्ती स्पर्धांचे आयोजन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनं न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद ही भारतीय कुस्ती संघटनेकडून बरखास्त करण्यात आली आहे. दिल्लीत झालेल्या संघटनेच्या वार्षिक सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी काही दिवसात हंगामी समितीची निवड होईल अशी माहिती मिळत आहे. जिल्हा संघटना आणि काही पैलवानांकडून आलेल्या तक्रारींमुळे ही कारवाई झाल्याची माहिती मिळत आहे.
शरद पवार यांचे बृजभुषण सिंग यांच्या चांगले संबंध, तरीही कारवाई
शरद पवार आणि भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बृजभुषण सिंग यांचे चांगले संबंध आहेत. तरी देखील महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर बृजभुषण सिंग हे चांगलेच चर्चेत आले होते. कारण बृजभुषण सिंग यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केला होता. उत्तर भारतीयांची राज ठाकरेंनी माफी मागावी आणि मगच अयोध्येत यावं अशी भूमिका त्यांनी घेतली होती. या भूमिकेमुळं बृजभुषण सिंग हे चर्चेत आले होते. दरम्यान, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेविरोधात विविध तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.