रवी जयस्वाल | जालना : राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे अनेक रस्त्यांची पोलखोल झाली आहे. यात शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे (Shegaon-Pandharpur National Highway) नाव आता आले आहे. दोन हजार कोटी खर्चून काम सुरु असलेल्या शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाला तडे गेले आहेत. यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
शेगाव-पंढरपूर महामार्गाला तडे गेले आहेत. तब्बल दोन हजार कोटी रुपये या रस्त्यासाठी मंजूर करण्यात आले होते. मागच्या चार वर्षांपासून या महामार्गाचं काम सुरु असून अंतिम टप्प्यात काम आलं आहे. मात्र, काम पूर्ण होण्याआधीच या महामार्गाला तडे गेल्याचं दिसत आहे. जालना जिल्ह्यातून 95 किलोमीटरचा हा रस्ता गेला असून तळणी जवळ या रस्त्याला खड्डे पडले आहेत. त्यामुळं या कामाची चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, शेगाव ते पंढरपूर हा ४३० किलोमीटरचा दोन हजार कोटी रुपये खर्चून रस्ता तयार करण्यात येत आहे. रस्त्याचे काम मेघा इंजिनिअरिंग व इन्फ्रा कंपनी हैदराबाद यांना देण्यात आले असून संपूर्ण रस्ता हा सिमेंट काँक्रीटचा असणार आङे. परंतु, काम पूर्ण होण्याआधीच या रस्त्याला अनेकदा तडे गेल्याचे पाहायला मिळाले आहे.