राज्यात १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे आगमन झाले असून आज सकाळपासूनच राज्यात ठिकठिकाणी पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना, तसेच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याकडून राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकणात मुंबई, ठाण्यासह तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून विदर्भात काही भागांत जोरदार सरी कोसळत आहेत.
यंदा राज्यासह देशात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी नोंदले गेले आहे. ऑगस्ट महिन्यात विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस सरासरीच्या तुलनेत मागे पडला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील ठराविक भागांतच पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात कुठेही मोठा पाऊस होऊ शकला नाही. त्यामुळे राज्यातील एकूण पाणीसाठय़ातही मोठी घट निदर्शनास येत आहे.