राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण काही प्रमाणात ओसरत असल्याचं चित्र आहे. मात्र अद्याप मृत्यू थांबलेले नाहीत. दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या कोरोनामुक्त झालेल्यांपेक्षा कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे.
आज दिवसभरात राज्यात ६ हजार ६०० नवीन कोरोनाबाधित आढळून आले, तर ७ हजार ४३१ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. याशिवाय, राज्यात आज २३१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ६०,८३,३१९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.६१ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६२,९६,७५६ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १,३२,५६६ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.