विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. हिवाळी अधिवेशनात शिवसेना ठाकरे गट राज्य सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, मराठा आरक्षणाचा मुद्दा, आरोग्य विभागातील कथित घोटाळा, ड्रग्जच्या कारवाया, अशा अनेक मुद्द्यांवरुन या हिवाळी अधिवेशनात शिवसेना ठाकरे गट सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत.
आजपासून पुढचे 10 दिवस नागपूरात हे हिवाळी अधिवेशन सुरु असणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन खडाजंगी होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आज शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधकांचे विधानभवनाच्या परिसरात आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. अशी विरोधकांची मागणी आहे.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन सुरु केलं आहे. गळ्यात संत्र्यांच्या माळा घालून, हातात कापूस घेऊन. हातात पाट्या घेत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. धानाला बोनस मिळाला पाहिजे, कापसाला भाव मिळालाच पाहिजे, बळीराजा अवकाळीने त्रस्त, सरकार जाहिरातीत व्यस्त, शेतकरी झाला कासावीस, खोके सरकार ४२० अशा विरोधकांकडून घोषणा देण्यात येत आहेत.