Maharashtra Assembly Session : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. हिवाळी अधिवेशनात शिवसेना ठाकरे गट राज्य सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, मराठा आरक्षणाचा मुद्दा, आरोग्य विभागातील कथित घोटाळा, ड्रग्जच्या कारवाया, अशा अनेक मुद्द्यांवरुन या हिवाळी अधिवेशनात शिवसेना ठाकरे गट सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत.
तसेच नवाब मलिकांवरुन खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन खडाजंगी होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधकांचे विधानभवनाच्या परिसरात आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. अशी विरोधकांची मागणी आहे.
यातच नबाव मलिकांच्या निमित्तानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांचा कलगीतुरा पाहायला मिळाला. नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्याचा मुद्दा विरोधकांनी विधान परिषदेत उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांना महायुतीत घेण्यास विरोध केला आहे. यासाठी फडणवीसांनी अजित पवारांना खुले पत्र लिहीले आहे.