२२ जुलैला दुपारी ४ वाजताच्या सुमारास महाडच्या तळीये गावात दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली ३५ घरे दबली गेली. तळीयेमध्ये मृतदेह बाहेर काढताना कोणाचे हात तर कोणाचे पाय अशा छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह सापडत होते. त्यामुळे बचाव कार्य थांबवा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती.
आत्तापर्यंत मृतांचा आकडा ५३ वर पोहोचला आहे. काल दिवसभरात ११ मृतदेह बाहेर काढले असले तरी ३१ मृतदेह अजूनही ढिगाऱ्याखालीच आहेत. मात्र आता हे मृतदेह कुजण्यास सुरू झाल्याची शक्यता असल्याने या मृतदेहांची विटंबना टाळण्यासाठी त्यांना तिथंच राहून द्यावं.. आणि त्या जागीच अंत्यसंस्कार व्हावेत. अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली.
आजही या पथकांनी घटनास्थळी येऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. मात्र, त्यानंतर दोन तासाने रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं. या पथकांनी रेस्क्यू ऑपरेशन थांबवल्यानंतर स्थानिकांनी त्यांना गराडा घातला. तुम्ही रेस्क्यू ऑपरेशन थांबवा. त्याबद्दल आमचा आक्षेप नाही. मात्र, जे लोक बेपत्ता आहेत. त्यांना मृत घोषित करा, अशी मागणी या नागरिकांनी केली. त्यामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.