संजय राठोड|यवतमाळ :
ग्राहकांना जादा व्याजदराचे आमिष दाखवून कलकाम रिअर इन्फ्रा (इं) लिमिटेड कंपनीने जवळपास दोन कोटी रुपयांनी गंडा घातला आहे. मुदत संपूनही पैसे परत मिळत नसल्याने अखेर ग्राहकांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. (lure of extra interest is a Cheating of Rs 2 crore to the customers)
विष्णू दळवी (रा. मुंबई), हे कलकाम कंपनीचे प्रमुख असून, अन्य आठ जणांनी ग्राहकांना गुंतवणूक करण्याचे प्रोत्साहन दिले. त्यांनी यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भात कार्यक्रम घेवून तीनपट रक्कम देण्याचे आमिष दाखविले. पैसे भरणार्या ग्राहकांना बॉण्डही देण्यात आला. कलकामने प्लॅन चार्टनुसार ग्राहकांनी एक लाखाची गुंतवणूक केल्यास 36 महिन्यात दीड लाख देण्याचे आमिष दाखविले. त्यामुळे ग्राहकांनी या कंपनीत मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवली. सध्या 267 ग्राहकांची रक्कम दोन कोटी दहा लाख एक हजार रुपयाच्या घरात आहे.
कार्यालय चार वर्षांपासून बंद
कार्यालयदेखील चार वर्षापासून बंद आहे. त्यामुळे म्यॅच्युरीटीचा कालावधी होऊनही रक्कम मिळाली नाही. कंपनीकडून एक जुलै 2020 ला पैसे परत देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचाही कंपनीला विसर पडला आहे. संबंधित कंपनीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी तक्रारीतून करण्यात आली. तक्रार अर्जावर अर्चना राठोड, विक्रम सूर्यवंशी, साजिद शेख मन्सुरी, अजय अडपल्लीवार, शबाना मो. अकरम शेख यांच्यासह मंदाकीनी खांदवे, वैशाली शिरभाते, स्वाती डहाके, माधुरी सिंघानिया, सुनीता सूर्यवंशी, सखाराम खांदवे, अजय सिंघानिया आदींच्या स्वाक्षर्या आहेत.