अमरावती : विधवा महिलांसाठी 'गंगा भागीरथी' असा शब्दप्रयोग करण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. यावर सर्वच स्तरातून टीका करण्यात येत आहे. तर, या शब्दाविरोधात कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या असून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. मी पण विधवा आहे पण मी गंगा भागीरथी नाही, अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारला सुनावले आहे.
विधवांना आता गंगा भगीरथी म्हणतात. उद्या केस कापायला लावाल. परवाच्या दिवशी म्हणाल त्यांना गंगेवर सोडून द्या, अशी संतप्त प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. तर, मी पण एक विधवा आहे. मी 29 वर्षाची होती. तेव्हा माझे यजमान गेले. पण, संविधान होते म्हणून मी आज तुमच्यासमोर आमदार म्हणून उभी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले होते म्हणून मी शिक्षण घेतलं, असं यशोमती ठाकूर यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, गंगा भगीरथी या शब्दावरुन वाद निर्माण झाला असून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची तोफ डागली होती. तर, सुप्रिया सुळे यांनी थेट पत्र लिहीत गंगा भगीरथी हा शब्द वेदनादायी असल्याचे म्हंटले होते. तर, चित्रा वाघ यांनीही सरकारला घरचा आहेर दिला होता. नवरा गेल्यानंतर गंगेवर जाऊन केशवपन केलेल्या स्त्रीला गं.भा. म्हणायची, लिहायची पद्धत होती. याऐवजी नुसतं श्रीमती म्हणायला काय हरकत आहे, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला होता.