अमरावती : राज्यभरात मागील काही दिवसांपासून पाऊस जोरदार बॅटींग करत आहे. विदर्भातही मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. विदर्भाचं गांभीर्य सरकारला नाही, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
पश्चिम विदर्भात मागील ७२ तासात 3 लाख हेक्टरवर नुकसान झाले. मात्र, इतकं नुकसान होऊन सुद्धा विदर्भाकडे कोणी बघायला तयार नाही. पश्चिम महाराष्ट्रात जर नुकसान झालं असतं तर सगळे नेते तुटून पडले असते. मात्र, विदर्भाकडे कोणी बघत नाही, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी सरकारवर केली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी विदर्भात नुकसानीची पाहणी करण्यासाठी यायला पाहिजे होतं याच दुःख वाटते, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे.
दरम्यान, विदर्भातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वाघाडी वस्तीत पुराचे पाणी शिरल्याने दोघांचा मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून तिघेजण वाहून गेले.