मुंबई : पावसाळी अधिवेशनापुर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विधान परीषद उपसभापती आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गोऱ्हेंनी प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर नीलम गोऱ्हे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचा प्रस्ताव प्रवीण दरेकर यांनी मांडला आहे.
उपसभापती नीलम गोऱ्हे पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी विरोधीपक्ष नेते असताना केला होता. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे अविश्वास ठरावही दाखल केला होता. मात्र, आता हा दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव मागे घ्यावा, असा प्रस्ताव प्रविण दरेकर यांनी मांडला. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रस्तावाला प्रसाद लाड यांनी अनुमोदन दिलं आहे.
दरम्यान, देशाच्या विकासासाठी पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. उपसभापतीपद सांभाळत पक्षाची भूमिका मांडत राहणार, अशी प्रतिक्रिया नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर, नीलम ताई तुम्हाला आता कोणतीही अडचण होणार नाही. पुढे आपल्याला खूप काम करायचं आहे. कोणीही तुमचा आवाज दाबणार नाही. आपण खूप ताकदीने काम करणार आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.