राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.१००० चौरस फुटाच्या दुकानातच वाईन विक्री करता येणार आहे.आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना त्याबाबतची माहिती दिली. महाराष्ट्रात बऱ्याच वाईनरी असताना आता १००० चौरस फुटांच्या छोट्या दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या फळ उत्पादनावर वाईनरी चालते. त्यांना चालना देण्यासाठी वाईन विक्री करता येणार आहे.
राज्यात नवी वाईन पॉलिसी राबवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. पुढच्या वर्षापर्यंत वाईन उद्योगाचा विस्तार १ हजार कोटी लीटरपर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यादृष्टीनं आता राज्य सरकारनं पाऊलं टाकायला सुरुवात केली आहे.
राज्यात वाईनची दरवर्षी ७० लाख लिटरची विक्री होते. सरकारच्या या नव्या धोरणामुळं हा आकडा १ हजार कोटी लिटरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्या आधी राज्य सरकारनं वाईनवर प्रति लिटर १० रुपयांचा अबकारी कर जाहीर केला आहे. त्यामुळे वाईन थोडी महाग होणार आहे. उत्पादन शुल्कानं या आधीच आयात व्हिस्कीवरील शुल्क ३०० टक्क्यांवरून १५० टक्क्यांवर आणले आहे. आता सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.