मुंबई : राज्यात शिवसेना (ठाकरे गट ) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर आले होते. त्यामुळे राजकीय नवीन समीकरण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अशातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी युतीचे संकेत दिले आहेत. ठाकरे-आंबडकर एकत्र येणे देशासाठी आदर्श ठरेल, असे महत्वपूर्ण विधान त्यांनी केले आहे.
संजय राऊत म्हणाले की, अन्याय व असत्य याचे बुलडोझर वारंवार फिरवला जात असेल तर त्यांच्याशी लढण्याची आमची मानसिक आणि पक्ष म्हणून सर्व तयारी आहे. आम्ही लढणार. सर्वच पळकुट्टे नसतात. काही लढणारे असतात म्हणून महाराष्ट्र टिकून राहीला आणि स्वातंत्र्याची मशाल देखील पेटत राहिली, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.
देशात आणि महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्याच्या उद्देशाने प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना व इतर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष एकत्र येणे आदर्श ठरु शकते. हा महाराष्ट्र आणि देशासाठी एक आदर्श असा फॉर्म्युला होऊ शकतो. प्रकाश आंबेडकर हुकुमशाही विरोधात उभे राहिले तर नक्कीच प्रकाश आंबेडकर, उध्दव ठाकरे किंवा इतर प्रमुख नेत्यांकडून देशाला एक चांगले दिशा दर्शन होऊ शकते. आणि त्यादृष्टीने सकारात्मक पावले पडत आहेत, असे संकेत संजय राऊतांनी दिले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा शिवसेना (ठाकरे गट ) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीच्या चर्चांना सुरु झाल्या आहेत.
तर, एका कार्यक्रमात उध्दव ठाकरे यांनीही युतीबाबत महत्वपूर्ण विधान केले होते. दोघांचे वैचारिक व्यासपीठ एकच आहे. त्यामुळे एकाच व्यासपीठावर येण्यासाठी अडचण आली नाही आणि येणार नाही, ज्याची अपेक्षा लोकांना आहे तशी ती अडचण येणारही नाही. दोघेही विचारांचे वारसे घेऊन पुढे आलो आहोत, असे त्यांनी म्हंटले होते.
दरम्यान, राज्यात गोंधळाची परिस्थिती आहे. पुढील दोन महिन्यानंतर वेगळे चित्र असेल, असे विधान रावसाहेब दानवे यांनी केले होते. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, रावसाहेब दानवे चुकुन खरे बोलून जातात. दोन महिन्यानंतर वेगळ चित्र असेल म्हणजेच मध्यावधीची घोषणा होऊ शकते. किंवा हे सरकार पडू शकते असे संकेत त्यांनी दिलेले आहेत. आणि हे सरकार 100 टक्के पडणार याविषयी माझ्याकडे पुर्ण माहिती आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.