मुंबई : वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युतीची घोषणा काहीच दिवसांपुर्वी करण्यात आली. परंतु, ही युती शिवसेनेपुरतीच मर्यादीत असून वंचित महाविकास आघाडीचा भाग सामील करण्यासाठी चर्चा सुरु आहे, असेही पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, प्रकाश आंबेडकर सातत्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. यामुळे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील होणार का, यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि शिवसेना अशी आघाडीची चर्चा झालेली आहे आणि पुढील निवडणुकीत आम्ही एकत्र सामोरे जाऊ. जागा वाटपाबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. वंचित बहुजन आघाडीशी युती करण्याबाबत आमच्यासमोर कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे यावर चर्चाच होऊ शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी मांडली.
दरम्यान, वंचित आणि शिवसेनेच्या युतीनंतर दोनच दिवसात यामध्ये खडा पडला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत, असे वक्तव्य केले होते. यावर संजय राऊत यांनी आंबेडकरांचा समाचार घेतला व सल्ला दिला. त्यावर आंबेडकर यांनी प्रत्युत्तर देत मला सल्ला देणारे संजय राऊत कोण? माझी युती शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंशी झाली आहे, असे म्हंटले होते. तर, मी कोण हे उद्धव ठाकरे ठरवतील, असा पलटवार संजय राऊत यांनी केला.