Mohit Kamboj Rohit Pawar : राज्यात एकीकडे राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना, नुकतंच राज्याचं पावसाळी अधिवेशन मोठ्या गोंधळात पार पडलं. त्यानंतर अधिवेशन संपताच दसरा मेळाव्यासह अनेक मुद्यांनी तोंड वर काढलं आहे. अशातच आता आमदार रोहित पवारांबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ग्रीन एकर या कंपनीची ईडीकडून सध्या चौकशी सुरू आहे. अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. परंतु, रोहित पवार हे या कंपनीचे माजी संचालक राहिलेले आहेत. या चौकशीमुळे रोहित पवारही अडचणीत येणार असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (Will Rohit Pawar's problems increase? What is Green Acres Case Mohit Kamboj)
काय आहे प्रकरण
ग्रीन एकर या कंपनीबद्दल काही दिवसांपूर्वी तक्रार प्राप्त झाली होती. ग्रीन एकर कंपनीत मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय आहे. याच कारणामुळे ईडीकडून त्या कंपनीची प्राथमिक चौकशी सुरू झाली आहे. 2006 ते 2012 या कालावधीत रोहित पवार हे या कंपनीचे संचालक राहिले आहेत. रोहित पवारांसोबत कंपनीतील सर्व सदस्य हे वाधवान यांच्या कंपनीत पार्टनर देखील आहेत. स्वतःहा राकेश वाधवान देखील कंपनीत संचालक राहिले आहेत. त्यामुळे रोहित पवार-राकेश वाधवान यांच्या संबंधाचा देखील ईडीकडून तपास केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मोहित कंबोज यांनी ट्विट केले होते, त्यावर रोहित पवार यांनी दिले हे उत्तर
राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, नवाब मलिक तसेच शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत तुरुंगात असताना राष्ट्रवादीचा बडा नेता त्यांच्यासोबतच लवकरच तुरुंगात दिसेल, असा दावा करताना मोहित कंबोज यांचा रोख विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे होता. मोहित कंबोज यांच्या ट्विटनंतर राज्याच्या राजकारणात मोठा स्फोट झाला. मोहित कंबोज यांनी अजित पवारांना टार्गेट केल्यानंतर रोहित पवार यांनी कंबोजांना रोखठोक उत्तर दिलं होतं.
ओव्हरसिज बॅंकेचा ५२ कोटी रुपयांचा घोटाळा आणि त्याचसोबत पीएनबी बॅंकेचा घोटाळ्याच्या प्रकरणात ज्या मोहित कंबोज यांचं नाव आलं आहे, तुम्ही त्याच कंबोजांबद्दल मला प्रश्न विचारलाय ना..." असं म्हणत शालजोडीतून रोहित पवारांनी कंबोज यांच्यावर निशाणा साधला होता. रोहित पवार यांची प्रतिक्रिया कंबोज यांच्या जिव्हारी लागली होती. यानंतर त्यांनी आता आपला मोर्चा रोहित यांच्याकडे वळवला असल्याचे दिसत आहे.
मोहित कंबोज यांनी ट्विट करत रोहित पवारांना केलं टार्गेट
मोहित कंबोज म्हणाले होते की, "बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीसंदर्भात मी सध्या अभ्यास करत आहे. त्यासंदर्भातली संपूर्ण माहिती मी लवकरच बाहेर घेऊन येईन", असा इशाराच कंबोज यांनी दिला होता. रोहित पवार यांच्या ॲग्रीकल्चर आणि साखर कारखान्यांबाबतचा अभ्यास सुरू केल्याचे कंबोज यांनी ट्विटमधून स्पष्ट केलं.
"बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीच्या यशाचं रहस्य काय, ज्याचा अभ्यास करून मी तरूणांसमोर मांडेन, ज्याचा त्यांना भरपूर फायदा होईल", असं उपहासात्मक ट्विट करून कंबोज यांनी रोहित पवार एकप्रकारे निशाण्यावर असल्याचंच सांगितलं आहे. यामुळे रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर या कंपनीवर ईडीच्या चौकशीबद्दल कंबोज यांनी संशय व्यक्त केला आहे.