बंगळूरू : कर्नाटक निवडणुकीसाठी मतमोजणी आज होणार आहे. कर्नाटकात 73.19 टक्के इतके मतदान झाले. या निवडणुकीत कॉंग्रेस व भाजपमध्ये मुख्य लढत असली तरी त्रिशंकु परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशात, जेडीएस किंगमेकर ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, 2024 ची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
कर्नाटकच्या अनेक एक्झिट पोलमध्ये संभाव्य त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, काँग्रेसला स्वतंत्रपणे बहुमत मिळू शकते, अशी शक्यताही काहींनी व्यक्त केला. पोल डायरीच्या अंदाजानुसार, भाजपला 85-104 जागा मिळण्याची शक्यता आहे. आणि कॉंग्रेसला 57-105 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर, जेडीएसला 24-27 जागा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे 113 ही मॅजिक फिगर गाठण्यासाठी भाजप अथवा कॉंग्रेसला जेडीएससोबत युती करावी लागणार आहे. यामुळे निवडणुकीत जेडीएस किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.
जेडीएस प्रमुख एचडी कुमारस्वामी यांनी भाजप आणि काँग्रेसने त्यांच्या अटी मान्य केल्या तर ते त्या पक्षाला पाठिंबा देण्यास तयार आहेत. त्यांना राज्याचे मुख्यमंत्री करावे ही त्यांची मुख्य अट असल्याचे म्हंटले आहे. परंतु, भाजप आणि कॉंग्रेस दोन्हीही पक्षाने आघाडीला नकार दिला असून स्पष्ट बहुमत मिळण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.