ओंकार कुलकर्णी | धाराशिव : राज्यात राजकीय भूकंपानंतर आता अजित पवारांच्या गटात इनकमिंग सुरु झाली आहे. धाराशिवचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीमधील फुटीनंतर त्यांनी अस्वस्थ झाल्याचे सांगत राजीनामा दिला. परंतु, सुरेश बिरजदार अजित पवारांच्या गटात जाण्याची चर्चा सुरु आहेत.
सुरेश बिराजदार यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे ई-मेलद्वारे पाठवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फूटीनंतर अस्वस्थ झाल्याचे सांगत आम्ही नेमकी कोणती भूमिका घ्यायची? असा प्रश्न समोर उभा राहिला आहे. त्यामुळे हा राजीनामा दिला आहे. एकीकडे नैसर्गिक परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याला पुन्हा उभा करण्यासाठी अजित पवार यांनी सहकार्य केले. त्यामुळेच हा कारखाना उभा राहू शकता असंही त्यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे आगामी काळात बिराजदार अजित पवार गोटात सामील होतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, बिराजदार यांच्या राजीनाम्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात मोठा धक्का बसल्याचे बोललं जातं आहे.