महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे. मनोहर जोशी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
1995 साली ते युतीच्या सत्तेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. १४ मार्च १९९५ रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र १९९९ मध्ये त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. पुणे शहरातील एक भूखंड प्रकरण यासाठी कारण ठरले. मनोहर जोशी यांचे जावई गिरीश व्यास यांच्या शाळेसाठी पुण्यातील एक भुखंड राखून ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
यामुळे राजकारण चांगलेच तापले आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपद सोडायला सांगितले. "प्रिय मुख्यमंत्री, तुम्ही आता जेथेही असाल तेथे, कृपया सर्वकाही थांबवा आणि तात्काळ राज्यपालांकडे राजीनामा सुपुर्द करा. त्यानंतर मला भेटायला या" असा संदेश बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना पाठवला होता. त्यानंतर लगेच मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.