पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. यावेळची निवडणूक विविध कारणांमुळे चांगलीच चर्चेत राहिली. एनडीए पुढे इंडिया आघाडीनं तगडं आव्हान उभं केलं. भाजपकडून या निवडणुकीत चारशे पारचा नारा देण्यात आला होता. मात्र प्रत्येक्षात भाजपला स्वबळावर पूर्ण बहुमत मिळवता आलं नाही. नरेंद्र मोदींसोबत काही मंत्रीही शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 7:15 वाजता मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. पंडीत नेहरूंनंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे मोदी हे पहिले नेते असणार आहेत. त्यामुळे कोणाला आणि कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत शपथ घेणाऱ्या नेत्यांची नाव आता समोर आली आहे. भाजप नेते नितीन गडकरी, अमित शाह, प्रल्हाद जोशी, जेडीयूचे खासदार रामनाथ ठाकुर, सर्वानंद सोनोवाल, चिराग पासवान, अर्जून राम मेघवाल, जीतेन राम मांझी, जयंत चौधरी, अनुप्रिया पटेल आणि एचडी कुमार स्वामी यांना आतापर्यंत दिल्लीतून मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपला राज्यात फक्त 9 जागी विजय मिळवता आला आहे. परंतु आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन राज्यात भाजपला 4 ते 5 मंत्रिपदं दिली जाऊ शकतात अशी चर्चा आहे. महायुतीत भाजपच्या तुलनेत शिवसेनेला चांगले यश मिळाले आहे. शिवसेनेने 7 जागी विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीचा रायगडमधून सुनिल तटकरे यांच्या रुपात एकच खासदार निवडून आला आहे. तरी देखील विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राष्ट्रवादीला देखील एक मंत्रिपद दिले जाऊ शकते.