जळगाव : नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी मोठा विजय मिळवला. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा तब्बल 29 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव झाला. यानंतर महाविकास आघाडीतूनच सत्यजित तांबेंना विजयासाठी मदत झाल्याचे अनेक दावे करण्यात येत आहे. अशातच, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी थेट नाव सांगत सत्यजित तांबेंनी मदत केल्याचा गौप्यस्फोट केला आहे.
शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा देण्यास व त्यांचा प्रचार करून मतदान करण्याचे आवाहन करण्यास नेत्यांना उशीर झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती व त्यातच माजी आमदार सुधीर तांबे यांचे काँग्रेसच्या नेत्यांशी असलेले चांगले संबंध यातूनच जळगाव जिल्ह्यात काँग्रेसचे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील व काँग्रेसचे विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांनी सत्यजित तांबेंना मदत केली असावी, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केले आहे.
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी नुकतेच सत्यजित तांबे यांना महाविकास आघाडीतील काहींनी मदत केल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता एकनाथ खडसे यांनी सत्यजित तांबेंना काँग्रेसचे माजी खासदार व आमदारांनी मदत केल्याचे म्हंटल्याने पुन्हा एकदा काँग्रेस-राष्ट्रवादीमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांचा तब्बल 29 हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव झाला. सत्यजीत तांबे यांना तब्बल 68 हजार 999 मतं मिळाली आहेत. त्यांचा तब्बल 29 हजार 465 मतांनी विजय झाला.