अमरावती (सूरज दाहाट) : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. याप्रकरणी राणा यांच्या स्वीय्य सहाय्यकांनी पोलीस स्टेशनमध्ये (Police Station) तक्रार दाखल केली आहे. या अज्ञात व्यक्तीविरोधात कठोर कारवाईची मागणी नवनीत राणा यांच्यामार्फत करण्यात आली आहे.
नवनीत राणा यांना जीवानिशी मारण्याचा धमकीचा फोन एका अनोळखी नंबरवरुन सातत्याने येत असून आतापर्यंत ११ वेळा फोन आला आहे. फोनवरून अज्ञात व्यक्ती अर्वाच्च भाषा वापरून नवनीत राणा यांना धमकी देत असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. महाराष्ट्रात येऊ देणार नाही, आलात तर जीवानिशी मारू. पुन्हा हनुमान चालीसा वाचली तर जीवे मारण्याची धमकी नवनीत राणांना फोनवरुन मिळाली आहे. याविरोधात नवनीत राणांनी दिल्ली पोलिसात तक्रार नोंदवली आहे.