अमोल धर्माधिकारी|पुणे :आगामी महापालिके निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. अशातच आता आता पालिका निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्ष ,भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करणार आहे. मात्र,आरपीआय लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वतःच्या निवडणूक चिन्हावर लढवणार, सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येईल,असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी पुणे दौऱ्यावर असताना सांगितले आहे.
आम्हाला मुंबई उपमहापौर द्यावे - आठवले
आज पुणे येथे दौऱ्यावर असताना आठवले म्हणाले की, पुणे शहरात देखील आमचे ५ नगरसेवक होते तेव्हा आम्हाला उपमहापौर पद दिलं, आता आम्हाला मुंबईत उपमहापौर द्यावे ही अपेक्षा त्यांनी बोलताना व्यक्त केली.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, शिंदे आणि फडणवीस दोघेही ॲक्टिव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहे. शिंदे- फडणवीस सरकार पडेल असं बोललं जात आहे. परंतु हे सरकार पडणार तर नाहीच मात्र, पुढचे पाच वर्ष देखील हेच सरकार अस्तित्वात राहील असे वक्तव्य त्यांनी बोलताना केले.
शिंदे गटाला दिलासा मिळेल, ठाकरेंच्या याचिकेत दम नाही
राज्यात चालत असलेल्या शिंदे गट आणि शिवसेनेतील वादावर बोलताना आठवले पुढे म्हणाले की, शिवसेनेचा निर्णय चुकीचा होता त्यामुळे त्यांच्यात आज उभी फूट आहे. एकनाथ शिंदे गटाला दिलासा मिळेल, ठाकरेंच्या याचिकेत दम नाही. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे, त्यामुळे धनुष्य बान देखील त्यांनाच मिळेल. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतत फिरत आहेत,काम करत आहे. मात्र उध्दव ठाकरे कुठच दिसत नाहीत. असा टोला आठवलेंनी ठाकरेंना मारला आहे.
शिवसेनेचा आरपीआय होणार नाही
शिवसेनाचा आरपीआय होणार नाही, पण आमची अवस्था शहरात सेनेसारखी होईल. सध्या आमची ताकद कमी आहे. आम्ही या परिस्थितीला आमदार खासदार निवडून आणू शकत नाहीत. आम्ही सगळ्यांना जोडण्याचा प्रयत्न करत आहोत. जसा पत्रकार संघाला प्रत्येक वर्षाला अध्यक्ष मिळतो. तसा निर्णय आम्ही पुण्यात पक्षासाठी घेतला आणि दरवर्षी आम्ही देखील निवडणुका घेणार आहोत. अशी माहिती रामदास आठवलेंनी बोलताना दिली.
शिंदे सरकारमध्ये मंत्रीपद मिळावे
राज्यात सध्या शिंदे- फडणवीस यांचे सरकार अस्तित्वात आहे. मात्र, या ,सरकारचा दुसरा मंत्रीमंडळ विस्तार पार पडणार आहे.मात्र, आठवलेंनी मंत्रीपद मिळण्याबाबत इच्छा बोलून दाखवली आहे. तेव्हा ते म्हणाले की, राज्यात सध्या महायुतीच सरकार आले आहे. यात आम्हाला संधी मिळावी १ मंत्रिपद मिळावं आणि १२ आमदारांमध्ये एक जागा आम्हाला मिळावी अशी मागणी आम्ही केली आहे.