पुणे : अमोल धर्माधिकारी | सत्ताधारी शिवसेना-भाजप युती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शुक्रवारी थंडावला. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी पदयात्रा, रोड शोवर भर देत मतदारांना मतदानाचे आवाहन केले. या पोटनिवडणुकीचा प्रचार युती आणि आघाडीतील आरोप-प्रत्यारोपांनी गाजला. निवडणूक प्रचार संपल्याने उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आता उद्या होणार्या मतदानाच्या तयारीला लागले आहेत.
भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अनुक्रमे कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. या पोटनिवडणुकीत भाजपने कसबा पेठमधून हेमंत रासने, तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) या महाविकास आघाडीने भाजपविरोधात उमेदवार दिले आहेत. कसब्याची जागा काँग्रेस लढत असून येथून रवींद्र धंगेकर, तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे रिंगणात आहेत.