महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 सदस्यांचा कार्यकाल 27 जूलै रोजी संपत असल्याकारणाने, या जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 12 जुलै रोजी मतदान होणार आहे तर त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी पार पडणार आहे. विधानसभेच्या आमदारांकडून विधान परिषदेच्या सदस्यांसाठी मतदान होणार असल्यानं आणि हे मतदान गुप्त पद्धतीनं असल्याकारणाने सर्वच राजकीय पक्षात या 11 जागांसाठी चुरस रंगणार आहे.
विधान परिषदेच्या 12 सदस्यांचा कार्यकाल 27 जुलै रोजी संपत असल्याने या जागांसाठी निवडणूक कधी लागते याकडं सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष होतं. विधानसभेतून निवडून द्यायच्या या 11 जागांसाठी अखेर 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होणार आहे. याकरता निवडणूक आयोगाकडून 25 जून रोजी अधिसूचना जारी केली जाणार आहे.
राज्यात आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष या विधान परिषदेच्या 11 जागांवर लागलं आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आल्याने त्यांचं मनोबल उंचावलं आहे. त्यातच राज्यातील 150 पेक्षा अधिक मतदार संघात त्यांना आघाडी मिळाली असल्याकारणानं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील बंडखोर आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून केला जात आहे. त्यामुळं ही निवडणूक अटीतटीची आणि रंगतदार होणार आहे.
निवृत्त होणारे सदस्य व त्यांचे पक्ष :
1) विजय गिरकर (भाजपा)
2) निलय नाईक (भाजपा)
3) रमेश पाटील (भाजपा)
4) रामराव पाटील (भाजपा)
5) महादेव जानकर (भाजपा मित्र पक्ष)
6) अनिल परब (उबाठा गट)
7) मनीषा कायंदे ( शिंदे गट)
8) डॉ. प्रज्ञा सातव (काँग्रेस)
9) डॉ. वजाहत मिर्झा (काँग्रेस)
10) अब्बदुल खान दुराणी (राष्ट्रवादी अजित पवार गट)
11) जयंत पाटील (शेकाप)