चिपळूण : बंडखोर आमदार उदय सामंत (Uday Samant) यांनी शिवसेना (Shivsena) वाढविली नाही तर शिवसेनेने सामंत यांना वाढविले, अशा शब्दांत शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे. विनायक राऊत यांनी बंडखोर आमदारांचा समाचार घेत उदय सामंत आणि दीपक केसरकर यांच्यावरी जोरदार टीका केली आहे. ते आज चिपळूणमध्ये बोलत होते.
विनायक राऊत म्हणाले की, आजही मध्यावधी निवडणुका झाल्या तर शिवसेनेचे किमान 100 आमदार निवडून येतील. उदय सामंत किंवा दीपक केसरकर यांचा आयत्या बिळात नागोबाप्रमाणे असून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्यामुळे शिवसेना वाढलेली नाही, शिवसेनेनं त्यांना वाढवलेलं आहे, अशी टीका त्यांनी बंडखोर आमदारांवर केली आहे. ही शिवसेना उद्धव साहेबांचीच शिवसेना आहे बंडखोरांची नाही, अशा शब्दांत खासदार राऊत यांनी उदय सामंत आणि दीपक केसरकर यांचा समाचार घेतला.
दरम्यान, शिवसेनेचा रत्नागिरीत 10 तारखेला मेळावा होणार आहे. त्यामध्ये उदय सामंत यांना सहभागी होण्याचा नैतिक अधिकार नाही आणि त्यांनी येऊही नये. बंडखोरांना सेनेत पुन्हा थारा नाही, असंही राऊत यांनी सामंत यांना सुनावलं आहे.