मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे आज अपघातात निधन झालं आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. यामुळे राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत असून श्रध्दांजली अर्पण केली आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले की, शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक, माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायक आणि महाराष्ट्रासाठी नुकसानकारक आहे. शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे निधन मनाला चटका लावणारे आहे. विधीमंडळातील आमचे सहकारी आणि मराठा समाजाच्या प्रश्नांना ऐरणीवर आणणारे आपले विनायकराव मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
मराठा समाजाचे प्रश्न राजकिय आणि सामाजिक पटलावर मांडण्याचे काम त्यांनी केले. मराठाच नव्हेतर शेतकरी आणि मजुरांचे प्रश्न मांडण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती मिळो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करताना भातान बोगद्याजवळ विनायक मेटे यांच्या गाडीचा ताबा सुटल्याने दुसऱ्या वाहनावर आदळली. या अपघातात मेटे यांना गंभीर मार लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती, असे धक्कादायक वास्तव त्यांच्या ड्रायव्हरने सांगितले आहे.