मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे आज अपघातात निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विनायक मेटे यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे. आपण संपूर्ण भारताला अपघात मुक्त केले पाहिजे. हीच विनायक मेटे यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे गडकरींनी म्हंटले आहे.
नितीन गडकरी म्हणाले की, विनायक मेटे यांचे अपघाती निधन अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मला खूप दुःख होत आहे. माझे ते अत्यंत जवळचे मित्र होते. महाराष्ट्रामध्ये विकास कामांमध्ये त्यांनी हिरीरीने भाग घेतलेला आहे. त्यांचे अपघाती निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. आम्ही आपला एक चांगला मित्र गमावला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
रस्त्यावर अपघात होतात. लोक मृत्युमुखी पडतात. सर्वांनी संवेदनशील नागरिक बनले पाहिजे. या अपघाताचे नेमकं कारण काय हे मला माहित नाही. मात्र, आपण संपूर्ण भारताला अपघात मुक्त केले पाहिजे. हीच विनायक मेटे यांना खरी श्रद्धांजली होईल. विनायक मेटे यांच्या आत्म्याला शांती मिळो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झालं आहे. वयाच्या 52व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला असून पुणे ते मुंबई प्रवास करताना मेटे यांचे वाहन अनोळखी वाहनावरती आदळल्याची माहिती मिळत आहे