मुंबई : तलाठी भरतीत मोठा भ्रष्टाचार झाला असून पेपर फुटले आहेत तरीही सरकार ही नोकर भरती रेटून नेण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, मुंबई पोलीस भरती आणि वन विभाग भरतीचा सुध्दा पेपर फुटला आहे. सत्ताप्राप्तीसाठी खाली केलेले खोके भरण्यासाठी पेपर फुटले का, असा खोचक सवाल करत या सर्व घोटाळ्यांची एसआयटीमार्फत चौकशी करून घोटाळा झाला असल्यास आणि शेवटच्या आरोपीपर्यंत पोहचणे शक्य नसल्यास या पदभरती रद्द करून नवीन उपाययोजनेसह तात्काळ फेरपरीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
राज्यातील पेपरफुटीवरून राज्यसरकारवर ताशेरे ओढत वडेट्टीवार म्हणाले की, सरकारने फेरपरिक्षेबाबत न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता तरुणांच्या मागणीचा विचार करावा. तीन-तीन महत्वाच्या परीक्षांचे पेपर फुटतातच कसे? नोकर भरती प्रक्रियेत घोटाळा झाला नाही, अशी एकही परिक्षा होत नाही. ईडी, सीबीआय अश्या कार्यतत्पर संस्था असूनही आरोपी सापडत नाही. नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील लाखो तरूणांच्या भवितव्याशी राज्य सरकार खेळ खेळत आहे. नोकर भरती प्रक्रियेत घोटाळा झाला नाही, अशी एकही परिक्षा होत नाही.
सरकारला परिक्षाही घेता येत नाहीत, सातत्याने पेपरफुटी होत आहे. राज्य सरकार मात्र त्याकडे गांभिर्याने पाहत नाही. खोके देऊन पक्ष फोडा, आता खाली खोके पुन्हा भरण्यासाठी नवीन मार्ग शोधा हेच राज्यात सुरू असलेल्या पेपर फुटी मागचे कारण असू शकते असं वाटत आहे.तलाठी भरती, मुंबई पोलीस भरती, वन विभाग भरती असे तीन तीन महत्वाच्या परीक्षांचे पेपर फुटतातच कसे? असा सवाल उपस्थित करत वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं.
ते म्हणाले की, ईडी, सीबीआय अशा कार्यतत्पर संस्था असूनही आरोपी सापडत नाही. त्यामुळे सदर पेपर फुटी रॅकेटला कोणत्या महाशक्तीचा आशीर्वाद असेल हे तरुणांना कळले पाहिजे त्यामुळेच त्यांनी या सर्व घोटाळ्यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची आणि तत्काळ फेरपरीक्षा घेण्यात यावी ह्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या मागणीला आमचा पाठिंबा असून सरकारने न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता तरुणांच्या मागणीचा विचार करावा, असं ट्विट करत वडेट्टीवारांनी म्हटलं आहे.