मुंबई : छगन भुजबळांनी सरसकट आरक्षणाला विरोध केल्याला आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. तर सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला माझा विरोध आहे, असे वडेट्टीवारांनी स्पष्ट केले आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, भुजबळांवर सरकार म्हणून भूमिका आहे की व्यक्तीगत आहे विचार करून बोलेन. सरकारमधील कॅप्टन आणि उपकॅप्टन यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. मंत्री म्हणून असेल तर ही सरकारची भूमिका आहे. शंभूराजे एक बोलतात आणि भुजबळ एक बोलतात, असे त्यांनी म्हंटले आहे. आता जातनिहाय जनगणाना केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. आता अशी मागणी होत आहे की सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्या. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला माझा विरोध आहे, असे वडेट्टीवारांनी स्पष्ट केले आहे. आज इतर समाजाला सर्व लाभांपासून वंचित राहावे लागते. याची श्वेतपत्रिका काढली पाहिजे मी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच, मराठा विरुध्द ओबीसी हा वाद चालू आहे. आमच्या मोबाईलवर सुद्धा आरक्षणाच्या मुद्द्यावर याबाबत मेसेज आणि धमकी आल्या आहेत. तुम्हाला आपपसात भांडून हे राज्य उद्धवस्त करायचे का, असा सवाल वडेट्टीवारांनी विचारला आहे.
दरम्यान, ग्रामपंचात निकालावरून जर छाती बडवून घेत असाल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घाव्यात, असे आव्हान वडेट्टीवारांनी सरकारला दिले आहे. 38 टक्के फक्त पाणीसाठा मराठवाड्यात शिल्लक आहे. मागच्या वर्षी 88 टक्के यावेळी शिल्लक होता. त्यामुळे राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे. कर्नाटक सरकारप्रमाणे संपूर्ण राज्य दुष्काळी घोषित करावे. आमदारांची दिवाळी करण्यासाठी तुम्ही फार पुढे आहेत. मग शेतकऱ्यांची दिवाळी कधी होणार? सरकारने त्वरित राज्य दुष्काळी जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.