मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने सिल्लोड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी बुधवारी गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.कार्यक्रम सुरू झाल्यानंतर समोर बसलेल्या काही तरुणांनी हुल्लडबाजी सुरू केली. त्यामुळे कार्यक्रम थांबवावा लागला. अब्दुल सत्तार यांनी माईक हातात घेऊन कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या लोकांना कुत्र्यासारखं मारा, त्यांचं कंबर मोडा, एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असून, पन्नास हजार लोकांना मारायला काय हरकत आहे. असे सत्तार म्हणाले.
हाडे तुटेपर्यंत यांच्यावर लाठी चार्ज करा असे पोलिसांना मंत्री अब्दुल सत्तार यांनी आदेश दिले. तुम्ही तुमच्या आई-वडिलांचा असाच पिक्चर पाहता का असे देखील अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, महायुती सरकारची हीच संस्कृती हीच भाषा ! मंत्री अब्दुल सत्तारांचे आभार मानतो जे त्यांनी महायुती सरकारचा खरा चेहरा स्वतः जनतेसमोर आणला. हजारोंच्या गर्दीसमोर पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे तोंडी आदेश देऊन लोकांना फोडून काढायची भाषा वापरतात.
महाराष्ट्र पोलीस दलातील जवानांना हे महायुतीतील मंत्री स्वतःच्या टोळीतील "गुंड" समजतात का ? सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनाच्या नावाखाली कार्यक्रम घेऊन उपस्थितांच्या आई बापांवर अश्लील भाषेत टिपणी करत हजारो माता भगिनींना मान शरमेनं खाली घालायला लावणारे हे कसले मंत्री आणि हे कोणते प्रबोधनात्मक कार्यक्रम ? असे वडेट्टीवार म्हणाले.