वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सध्या यवतमाळ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी यवतमाळ मध्ये माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. सध्या जे राज्यात चाललं आहे ते राजकारणाच्या दृष्टीनं योग्य नाही असे मत प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केले. सोबतच त्यांनी शिंदे गटावर देखील खळबळजनक भाष्य केले आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
ही काही गादीची लढाई नाही. मतदार हा राजा आहे. त्या राजाला कोणाला बसवासं वाटतं तो त्याला बसवेल. तो निर्णय आनंदानं स्विकारावा. ज्याप्रमाणे भाजपला उद्धव ठाकरे हे नको होते, तसेच त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा नको आहेत. हे बॅगेज त्यांना बाहेर काढायचे आहे. त्यांना परिस्थिती अनुकूल दिसली तरच एकनाथ शिंदे यांना निवडणुकांमध्ये सोबत घेतील असे वक्तव्य आंबेडकर यांनी बोलताना केले आहे.
अंधेरी पूर्व निवडणुकीसंदर्भात आम्ही वेट आणि वॉचच्या भूमिकेत
पुढे त्यांना अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक संबंधी प्रश्न विचारला असता त्यावर बोलताना आंबेडकर म्हणाले की, या निवडणुकीसंदर्भात आम्ही वेट आणि वॉचच्या भूमिकेत आहोत. ही निवडणूक दोन्ही शिवसेनेसाठी महत्वाची आहे. या निवडणुकीत भाजपचा उमेदवार असल्यानं त्याला पाठिंबा देण्याचा विषय नाही. आमच्याकडे अद्याप कोणीही पाठिंबा मागितला नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहे.