मुंबई : 2024 साली शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार ठरु शकतात. म्हणूनच सत्तातंर घडवून आणले, असा आरोप युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी केला आहे. त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ते उस्मानाबादमध्ये बोलत होते.
वरुण सरदेसाई म्हणाले की, पाच वर्ष उध्दव ठाकरे मुख्यमंत्री राहीले तर 2024ला ते पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार ठरु शकतात. आणि सर्व राज्यात भाजपविरोधी जितके पक्ष आहेत जरी त्यांची विचारसणी वेगळी असली तरी ते उध्दव ठाकरेंच्या चेहऱ्यांमागे भक्कमपणे उभे राहतील. हे त्यांना माहिती होते. म्हणूनच त्यांनी आपल्या लोकांना फोडले आणि आपल्याला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. पण, हे शिंदे-फडणवीस सरकार फार काळ टीकणार नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
तर, मागील ३० वर्षात शिवसेनेने, उद्धव ठाकरेंनी अनेक आव्हानं पेलली आहेत. यंदाचेही आव्हान आम्ही पेलू. समोर कुणीही येवो, कुणाचीही युती होवो. ३ पक्ष काय ३० पक्ष एकत्र आले तरीही मुंबईकर उद्धव ठाकरेंच्या पाठिशी खंबीर आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका शिवसेनाच जिंकणार, अशा विश्वासही सरदेसाईंनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनेतर भाजपने निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. मिशन मुंबई आणि मिशन बारामतीसाठी भाजपने कंबर कसली असून बडे नेते दोन्हीकडे दौरे करणार आहेत. तर, शिंदे-फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी जवळीक वाढत असून त्यांची युती होणार का, अशा तर्क-वतर्कांना उधाण आले आहे. अशात वरुण सरदेसाईंनी केलेला दाव्यानंतर आता भाजप काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.