नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर कॉंग्रेस आक्रमक झाली असून संपूर्ण देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. तर, राहुल गांधींनीही आपल्या ट्विटर बायोमध्ये महत्वपूर्ण बदल केले आहेत. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटरवरुन खासदार हटवत 'अपात्र खासदार' (Dis Qualified MP) असा उल्लेख करण्यात आला आहे.
राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. याविरोधात महाराष्ट्र काँग्रेसकडून राज्यभरात सत्याग्रह आंदोलन पाहायला मिळत आहे. तर, राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले होते.
मी अनेकदा सांगितले आहे की भारतात लोकशाहीवर हल्ला होत आहे. याची रोज नवी उदाहरणे मिळत आहेत. मी संसदेत पुरावे दिलेत. अदानी आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील संबंधांवर बोललो. नियम बदलून अदानींना विमानतळ देण्यात आले, याबाबत मी संसदेत बोललो. म्हणूनच माझ्या पुढच्या भाषणाला पंतप्रधान घाबरले होते, त्यामुळे मला अपात्र ठरवण्यात आले आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकातील कोलार येथील सभेत राहुल गांधी म्हणाले होते की, सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? या संदर्भात भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाची प्रतिष्ठा खाली आणल्याचा त्यांचा आरोप होता. याप्रकरणी अखेर सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यामध्ये न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीनही मंजूर केला होता.