छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांषु त्रिपाठी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुण्यात शिवप्रेमी संघटनांची बैठक घेतली.त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. येत्या काळात राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. वादग्रत विधानांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ते करणार आहेत. मात्र यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्यांचा देखील त्यांनी चांगलाच समाचार घेतला.
काय म्हणाले खासदार उदयनराजे भोसले?
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव फक्त राजकारणासाठी घेतले जात आहे. परंतु. त्यांच्याबाबत कोणी आक्षेपार्ह बोलत असेल तर कोणाला राग का येत नाही. महाराजांबाबत गलिच्छ प्रतिमा तयार केली जाते त्यावेळी राग कसा येत नाही. आता जनतेने विचार करणे गरजेचे आहे. महाराजांची अशी प्रतिमा तयार केली तर पुढच्या पिढीला महाराज असे होते असेच वाटेल. आता जनतेने यावर विचार करणे गरजेचे आहे. युगपुरूषांची प्रतिमा मलिन करणाऱ्यांना कडक शिक्षा होण्यासाठी तसे कायदे केले पाहिजेत. अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
पुढे ते म्हणाले की, मला पुढचं दिसतं. हा खडा टाकण्याचा प्रकार आहे. आज याने काही बोलायचं उद्या त्याने काही बोलायचं. किती अवहेलना सहन करायची? पण आता आम्ही सहन करणार नाही, येत्या 3 डिसेंबर रोजी आम्ही रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावर जाणार आहोत. तिथे आम्ही आक्रोश आंदोलन करणार आहोत. हे प्रतिकात्मक आक्रोश आंदोलन असेल. यावेळी आम्ही आमच्या वेदना व्यक्त करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.