राजकारण

फक्त नावातच ‘राजन’, पण माणूस ‘करंटा’ निघालाय; दिघेंच्या उध्दवांची विचारेंवर टीका

Rajan Vichare यांच्या पत्राला उद्धवराव जगताप यांचे प्रत्युत्तर

Published by : Team Lokshahi

मुंबई : शिवसेना खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांनी रविवारी आनंद दिघे (Anand Dighe) यांना खुले पत्र लिहीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली होती. दिघे साहेब घात झाला. आम्ही त्यांना माफ तरी कसं करायचं आम्ही, असा सवाल त्यांनी पत्राद्वारे विचारला होती. या पार्श्वभूमीवर आज उद्धवरावजगताप (Uddhavrao Jagtap) यांनी राजन विचारे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

काय आहे पत्रात?

तुम्हाला जाऊन आज 21 वर्षांचा काळ लोटला असे काही जण म्हणतात. पण माझा यावर अजिबात विश्वास नाही. कारण, साहेब तुम्ही तर आजही आमच्या सदैव सोबतच आहात. कल्याणच्या दुर्गाडीवर, मलंगगडाच्या पायऱ्यांवर, तलासरीच्या पाड्यांत, मोखाड्याच्या खेड्यात, लोकांमधील विश्वासात आणि शेकडो बहिणींच्या हृदयात. महाराष्ट्रात सर्वदूर तुम्ही आहात.

प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात, हिंदुत्वाच्या गजरात आणि शिवसैनिकांच्या नसानसात तुम्ही आहात. ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचे ठाणे हे समीकरण तुम्ही रुजवलं. जेव्हा राज्यात सगळीकडे संघर्षाची स्थिती होती, तेव्हा जे ठाणे सेनेच्या, मराठी माणसाच्या आणि कडव्या हिंदुत्वाच्या ठामपणे मागे उभे राहिले. भर सभेत ज्या ठाणेकरांना वंदनीय बाळासाहेबांनी दंडवत घातला. ज्या ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली. त्याच ठाण्याला 60 वर्षांत पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद मिळाले. आज तुमचा एक शिष्य मुख्यमंत्री झालाय. त्याने जेव्हा शपथ घेतली तेव्हा तुमचा ऊर अभिमानाने, आनंदाने भरून आला असेल ना! कडवा सैनिक राज्याचे नेतृत्व करतोय, हे समाधान मोठे असेल ना !

आज मुख्यमंत्री कार्यालयातही तुमचा वावर आहे. तुम्हाला अभिप्रेत असलेले सर्वसामान्यांचे सरकार अस्तित्वात आले आहे. आपल्या अडचणी दूर होतील, सरकारचा आधाराचा हात मिळेल, हा विश्वास सामान्यांच्या डोळ्यात दिसतोय. ठाण्याचा एक शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, हे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आज साकार झालंय. तोही तुमचाच शिष्य. पण, आज अनेकांना हा आनंद सहन होत नाहीये.

तुमच्या आठवणीने विचारे यांचा ‘ऊर’इतक्या वर्षांनी ‘सोयीने’ अचानक दाटून भरून आलाय. बोलताना कंठ दाटू लागलाय. मग शब्द मांडण्यासाठी त्याने केलेला पत्रप्रपंच वाचून हसावं की रडावं हेच आता कळेनासं झालं. फक्त नावातच ‘राजन’ आहे. पण, हा माणूस किती ‘करंटा’ निघालाय हो, असा निशाणाही त्यांनी साधला.

साहेब, तुम्ही शिवसेनेसाठी आपले सारं आयुष्य अर्पण केलं होतं. अडल्यानडल्यांचा तुम्ही आधार होता. पण, तुमची लोकप्रियता अनेकांच्या डोळ्यात सलत होती. तुमचे पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू होते. तुम्ही माझ्याकडे मन मोकळं केलं होतं. आज तुमच्या आठवणीने गळा काढणारी हीच मंडळी तुमच्या विरोधात कारस्थाने करण्यात अग्रस्थानी होता ना ? ज्यांच्या पाठीवर हात ठेऊन मोठं केलं तेच गद्दारी करताहेत, हे तुम्हालाही कळलं होतं. पण, तेवढ्यात तुम्ही आम्हाला सोडून गेलात. काळाने घात केला की घातपात झाला? यावर मी आता काय बोलावं? साहेब, तुम्ही त्या अपघातातून सावरला असतात, तर या गद्दारांना सोडलं असतं का ? उत्तर द्या साहेब, द्या उत्तर, कळू द्या जगाला, कोण होते खरे गद्दार, असे प्रश्न त्यांनी विचारले आहे.

साहेब, एकदा तुम्ही जैन मंदिरासमोर भर रस्त्यात राजनचे कानशील रंगवले होते. त्याला हाकलून दिले होते. पण, मीच त्याला पुन्हा घेऊन आलो. तुमच्या पायाशी घातले. ती माझी मोठी चूक झाली. मला क्षमा करा साहेब. तुमच्या निधनानंतर आपल्या शिवसैनिकांनी संतापाच्या भरात हॉस्पिटल पेटवलं. मोठा हलकल्लोळ झाला. त्या दिवशी हे विचारे कुठे होते कुणास ठाऊक ? त्यानंतर पोलिसांनी आपल्या पोरांना तुरुंगात टाकलं. शिवसैनिकांच्या वेदनांवर फुंकर घालायला एकटा एकनाथ खंबीर उभा राहिला होता.

आज आनंदाश्रमाकडे पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं म्हणे. पण, आपली गाऱ्हाणी घेऊन आनंदाश्रमात येणाऱ्या एकाच्या डोळ्यातले तरी अश्रू त्यांनी गेल्या 21 वर्षांत पुसलेत का? साहेब, तुमच्या जयंती-पुण्यातिथीला आनंदाश्रम आणि शक्तीस्थळावर फुलं अर्पण करतानाचे त्याचे फोटो आम्ही बघतो. पण, तुमचा लोकसेवेचा वारसा त्याच्याकडे कधी नव्हताच. तुमच्या पश्चातही तो रुजलेला दिसला नाही.

साहेब, टेंभीनाक्यावरील दहिहंडी आणि नवरात्रौत्सव हा तुमचा प्राण होता. पण, याच उत्सवांशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न जांभळी नाक्यावरून झाला. तुम्हाला तेव्हा किती वेदना झाल्या असतील? विचारही करवत नाही आणि आज राजकीय सोयीने नक्राश्रू ढाळतात, तेव्हा हसावे की रडावे कळत नाही. 2009 साली ठाणे लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार विजय चौगुले यांच्या विजयासाठी शिवसैनिक जंग जंग पछाडत होता. परंतु, चौगुलेंचा पराभव करण्यासाठी हाच कट कारस्थाने रचत होता. हे खरं आहे. सर्वांनाच माहीत आहे. ती पक्षाशी गद्दारी नव्हती का?

ज्या भागात राहतात, तिथून पालिका निवडणुकीत आपल्या पुतण्याचाही पराभव त्यांना रोखता येत नाही. 20-22 हजारांचा मतदारसंघ जिंकण्याची हिम्मत त्यांच्यात नाही. 20-22 लाखांच्या लोकसभा जिंकण्याची त्यांची लायकी आहे का ? शिवसेनाप्रमुखांचे करिष्मा, तुमचे आशीर्वाद, शिवसैनिकांनी गाळलेला घाम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लाटेत हे दोन वेळा हे खासदार झाले. एकनाथने त्याच्या विजयासाठी अक्षरशः रक्ताचा घाम केला. आज त्याच शिवसैनिकांना गद्दार म्हणत आवाज वाढवताना यांना लाज वाटत नाही ? त्यांचे मनही खात नसेल का? खोटे बोला, रेटून बोला हा अहंकार कुठून आला असेल? हा तुमच्या संस्कारांचा वारसा मुळीच नाही.

या खासदारांच्या कार्यबाहुल्याबाबत न बोललेलंच बरं… रामभाऊ म्हाळगी, राम कापसे, यांच्यासारखे ठाण्याचे कर्तृत्ववान खासदार स्वर्गात आपल्या कपाळावर हात मारून घेत असतील. या खासदारांचा करिष्मा कट्टर शिवसैनिकांना विचार …. निवडणुकीच्या काळात गोडगोड बोलणारे जिंकल्यानंतर शिवसैनिकांकडे ढुंकून तरी बघतात का घरात देवपुजा करताना हा माणूस कार्यकर्त्यांना शिविगाळ करतो. नावात राजन असलेला माणूस आणखी किती करंटा असू शकतो, अशी टीका उद्धवराव जगताप यांनी पत्रातून केली आहे.

कोरोना संक्रमणाच्या काळात एकनाथने केलं तेवढं काम तर राज्यात कुणी केले नसेल. असंख्य शिवसैनिक जीवाची पर्वा न करता अहोरात्र झटत होते. जीव धोक्यात घालून ऑक्सिजन, रक्त, बेड, औषधे, धान्य पोहोचवण्याच आटापिटा करत होते. दिघे साहेब तुमचे समाजसेवेचे व्रत शिवसैनिकांनी प्राणपणाने जपत असल्याचे दिसत होते. तेव्हा मात्र हे खासदार शोधूनही सापडत नव्हते. लोकांचे सोडा शिवसैनिकांचेही अश्रू त्यावेळी दिसले नाहीत. अडल्या नडल्या शिवसैनिकाचं एक तरी काम त्यांनी कधी केलंय का?

ज्या आमदार खासदारांना हे गद्दार म्हणत आहेत, त्यांच्यामागे आज लाखो शिवसैनिक आहेत. आमच्या बिचाऱ्या खासदारामागे पत्नी सोडली तर एकही लोकप्रतिनिधी दिसत नाही. मी, माझी बायको, माझा पुतण्या, माझ्या मुली, माझा धंदा आणि सत्तेतून लाटता येणारा मलिदा याच्या पलिकडे त्यांना कधी काय दिसलंय का ? तुमचा वारसा तुमच्या एकनाथाने, निष्ठावंत, कडव्या सैनिकाने समर्थपणे सांभाळलाय. प्रत्येकाची मायेने विचारपूस केली जातेय. पाठीवर आधाराचा हात ठेवत अश्रू पुसले जाताहेत. अडलेल्यांना काम, नाडलेल्यांना सढळ हस्ते मदत केली जातेय.

साहेब, तुमच्या कर्तृत्वाची सर कुणालाही येणार नाही. पण तुमची शिकवणूक उराशी जपून एकनाथ महाराष्ट्र एकनाथ पिंजून काढतोय. बाळासाहेबांच्या आणि तुमच्या हिंदुत्ववादी विचारांचा झेंडा कायम डौलाने फडकत ठेवण्यासाठी तो जिवाचं रान करतोय. तहानभूक विसरून आणि कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता शिवसेनेचा ज्वलंत विचार आणि संघटना जिवंत ठेवण्यासाठी धडपडतोय. त्याच्यामुळेच हिंदुत्वाची प्रेरणा असलेला भगवा महाराष्ट्रावरही पुन्हा डौलाने फडकतोय.

साहेब, तुम्ही हिंदुत्वाचे कट्टर समर्थक होते. शिवसेनेच्या आणि बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा कधीच मान्य केली नसती. राष्ट्रवादी, काँग्रेस पाठीमागे धावून हिंदुत्वाला नख लावू दिले नसते. बाळासाहेबांचा उल्लेख हिंदुहृहयसम्राट करण्याची लाज वाटणाऱ्यांना तुम्ही चाबकाने फोडून काढले असते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर तुमची निस्सीम भक्ती होती. परंतु, त्याच पुरंदरेंची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीला तुम्ही डोक्यावर घेतले असते का? स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणणे तुम्ही खपवून घेतले असते का, असा सवाल जगताप यांनी विचारला आहे.

आज तुम्ही हयात असतात तर तुम्ही सुध्दा हिंदुत्वाच्या रक्षणासाठी मैदानात उतरलाच असतात. तुमचा कट्टर शिष्य एकनाथने घेतली तीच आक्रमक भूमिका तुम्ही घेतली असती. एकनाथची भूमिका हा तुमच्या शिकवणीचा वारसाच तर आहे. तुम्ही आज आमच्यात नाही. पण, आम्ही तुमच्याच विचारांचा झेंडा घेऊन आम्ही पुढे निघालोय. ‘यशस्वी भव’चा आशीर्वाद आहेच !!! पाठीवर हात कायम असू द्या!! तुम्ही दाखवलेल्या मार्गावरील वाटचाल लोककल्याणाचीच आहे, हा विश्वास ठाम होऊ द्या, असे उद्धवराव जगताप यांनी म्हंटले आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी