मुंबई : गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर घणाघात केला होता. तसेच, आपण शिवसेनेतून बाहेर पडावे यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला होता. यामागील इनसाईड स्टोरीही राज ठाकरेंनी सांगितली. यावर उध्दव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मागील 18 वर्षांपासून तीच कॅसेट सुरु असल्यांची टीका उध्दव ठाकरेंनी राज ठाकरेंवर केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या १८ वर्षांत तीच रेकॉर्ड घासून-पुसून झाली आहे. मागील वर्षी १४ मे ला वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये माझी सभा झाली होती. यामध्ये मी माझं मत मांडलं होतं. तेव्हा मी एका चित्रपटाचा दाखला दिला होता. त्याच चित्रपटाचा दाखला तुम्ही बघू शकता, असं त्यांनी म्हंटले आहे. तसेच, राज ठाकरेंच्या पत्रानंतर अनेक गोष्टीवर तातडीने कारवाई होते. राज्यात अनेक गोष्टी आहे त्यांना त्या कळवा म्हणजे कारवाई होईल, असा टोलादेखील उध्दव ठाकरेंनी लगावला आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
शिवसेना सोडताना मला वेदना झाल्या. मी शिवसेना सोडताना म्हणलं होतो की 'माझा वाद विठ्ठलाशी नाही तर बडव्यांशी आहे'. शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतो की, मी उद्धव ठाकरेंना बसवून एकदा विचारलं, तुला काय हवं आहे, पक्षप्रमुखपद, सत्ता आली तर मुख्यमंत्रीपद हवं आहे? यात मला माझा रोल काय आहे ते सांग. मी सांगितलं की मला फक्त प्रचाराला बाहेर काढायचं असं करू नका. उद्धव म्हणाले की, मला काहीच नको आहे. आम्ही बाळासाहेबांकडे गेलो आणि सांगितलं की सगळं नीट झालं आहे. बाळासाहेब अधीर होते उद्धव यांना भेटायला पण ते बाळासाहेबांच्या समोर आलेच नाहीत. कारण उद्धव यांना शिवसेनेत आम्ही नको होतो, असा मोठा खुलासा राज ठाकरेंनी केला होता.