राजकारण

सेना कुणाची हे ठरवणारं नार्वेकर कोण? उध्दव ठाकरेंचे टीकास्त्र, SC ने सुमोटो कारवाई करावी

एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना असल्याचे राहुल नार्वेकरांनी स्पष्ट करत शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवले आहेत. यावर आता उध्दव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचावर आज ऐतिहासिक निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना असल्याचे नार्वेकरांनी स्पष्ट करत शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवले आहेत. यावर आता उध्दव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला हा निकाल अमान्य आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे उध्दव ठाकरेंनी सांगितले आहे.

उध्दव ठाकरे म्हणाले की, निर्णय देताना त्यांचा पायाच चुकलेला आहे. निर्लज्जपणाचा कळस त्यांनी गाठलेला आहे. पक्षांतर कायदा मजबूत करण्याऐवजी पक्षांतर कसं करावं अथवा पक्षांतराचा राजमार्ग कसा असायला पाहिजे, हे त्यांनी आज दाखवून दिलं, अशी टीका त्यांनी केली आहे.

घटनेनुसार जे सत्य आहे, तो सर्वोच्च न्यायलयाचा निकाल, सर्वोच्च न्यायलायचा निर्देश ते परिमाण मानलं जातं. आमच्या मागे महाशक्ती आहे, आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला जुमानत नाही हेच आजच्या त्यांच्या निकालातून स्पष्ट झाले आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

मूळ केस अपात्रतेची होती, पण त्यांनी अपात्र कोणालाच ठरवलं नाही. आमची घटना तुम्ही ग्राह्य धरत नसाल, तर तुम्ही आम्हाला अपात्र का नाही केलं? असा सवालही उध्दव ठाकरेंनी विचारला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा त्यांनी अपमान केला आहे, त्याबद्दल अवमान याचिका दाखल करता येते का, हे आम्ही पाहणार. देशातली लोकशाही ह्यांनी पायदळी तुडवली. आता सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व शिल्लक राहणार का, हे सर्वोच्च न्यायालयाने ठरवावं. सुमोटो दाखल करून घेण्याची कारवाई सर्वोच्च न्यायालय करणार आहे का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहेत.

गद्दारांची शिवसेना महाराष्ट्रातली आणि देशातली जनता मानणार नाही. मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण करून आपण शिवसेना संपवू, असं त्यांना वाटत होतं. पण शिवसेना काही संपणार नाही. त्यांना वाटत असेल त्यांनी घराणेशाही मोडीत काढली, तर त्यांनी लक्षात ठेवावं त्यांची गुलामगिरी सुरु झाली आहे, असा निशाणाही उध्दव ठाकरेंनी शिंदे गटावर साधाला आहे.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण