मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीकडून (ED) रविवारी अटक करण्यात आली. काल दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली. यावेळी राऊतांचे कुटुंबिय अत्यंत भावूक झाले होते. त्यांना धीर देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) हे राऊतांच्या घरी दाखल झाले आहेत.
ईडीचं पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्यात रविवारी सकाळपासून ठाण मांडून होतं. त्यानंतर संजय राऊत यांची नऊ तास चौकशी करण्यात आली. दुपारी चार वाजण्याच्या आसपास त्यांना ईडीने ताब्यात घेतले. अधिक चौकशीसाठी संजय राऊत यांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले. यावेळी राऊतांचे कुटुंबिय अत्यंत भावूक झाले होते. त्यांच्या आईला अश्रू अनावर झाले होते. तर, राऊतांच्या दोन्ही मुलीही ईडी कार्यालयाबाहेर हमसून रडल्या. यानंतर आज उध्दव ठाकरे हे संजय राऊतांच्या कुटुंबियांच्या भेटीला मैत्री बंगल्यावर भेट घेतली. व त्यांना धीर दिला.
संजय राऊत एकटे नसून संपूर्ण शिवसेना त्यांच्या पाठिशी असल्याचे उध्दव ठाकरेंनी त्यांच्या कुटुंबियांना सांगितले आहे. दरम्यान, दुपारी तीन वाजता उध्दव ठाकरे माध्यमांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दरम्यान, संजय राऊतांची जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. यानंतर त्यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात येईल. संजय राऊतांची आठ दिवसांची कोठडी ईडी मागू शकते. तर, संजय राऊतांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. यामुळे संजय राऊत यांना जामीन मिळतो की कोठडी याकडे लक्ष लागून आहे.