महाराष्ट्रातल्या सत्तानाट्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांना मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्रातील सरकार का पडले, कसे पडले इथपासून ते उद्याच्या शिवसेनेच्या भवितव्यापर्यंतच्या सगळ्यांना प्रश्नांना रोखठोक उत्तरं दिली.
आपला महाविकास आघाडीचा प्रयोग फसला का? असा थेट सवाल संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारला. त्यावर उद्धव ठाकरेंनी सांगितले, महाविकास आघाडीचा प्रयोग अजिबात फसलेला नाही, जर मविआचा प्रयोग फसला असता तर आपल्या कामाचा डंका जगभर वाजला नसता, असं उद्धव ठाकरेंनी ठासून सांगितलं.
म्हणून मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या ५ मध्ये माझं नाव
"कोरोना काळामध्ये मी अभिमानाने सांगेल, माझ्या संपूर्ण मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आणि जनतेने उत्तम सहकार्य केलं. म्हणूनच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या ५ मध्ये माझं नाव आलं. माझं नाव मी माझं मानत नाही तर ते जनतेचा प्रतिनिधी म्हणून माझं नाव आल्याचं समजतो. मंत्र्यांनी-अधिकाऱ्यांनी-जनतेने जर सहकार्य केलं नसतं तर मी कोण होतो? मी एकटा काय करणार होतो? कारण मी घराच्या बाहेरही पडत नव्हतो कारण घराबाहेर पडायचं नाही हेच मी लोकांना सांगत होतो.."
जर मविआचा प्रयोग झाला नसता तर...
उद्धव ठाकरे म्हणाले, "सुरुवातीच्या काळामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. तेव्हा राज्यामध्ये साडेसात ते साडेआठ हजार रुग्णाशैय्या होत्या. त्यात ऑक्सिजन बेड आले, व्हेंटिलेटर आले... पहिल्या लाटेत आपण आठ हजार बेड्सवरुन साडेतीन लाखांपर्यंत गेलो होतो... हे मी घरबसल्या केलं.. हॉस्पिटलमध्ये बेड्स नव्हते रुग्णवाहिका नव्हत्या, मग एक महिन्यात मोठा फरक दिसला, मग हे कसं झालं, कुणी केलं? कोरोनाच्या टेस्टसाठी आपल्या राज्यात फक्त दोन प्रयोगशाळा होत्या एक कस्तुरबा आणि दुसरी पुण्यात... आपण संपूर्ण राज्यात सहाशेच्या वर प्रयोगशाळा उभारल्या... तेही काम मी घरी बसून केलं... मग जर मविआचा प्रयोग झाला नसता तर हे काम मला करता आलं नसतं. माझं काम जनतेला आपलं वाटलं, मी मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार झाल्यावर जनतेच्या डोळ्यात अश्रू होते, यातंच सगळं आलं, असं प्रेम कुणाच्याही नशिबी नसतं.."
शिवसेना आणि संघर्ष एकमेकांच्या पाचवीला पूजलेले
शिवसेना ही तळपती तलवार ती म्यानात ठेवली तर ती गंजते. त्यामुळे ती तळपलीच पाहिजे आणि तळपणं म्हणजे संघर्ष आलाच. जिथे अन्याय तिथे वाघ हे शिवसेनेचं ब्रीदवाक्यच आहे.
घ्या निवडणुका, होऊ द्या जनतेच्या कोर्टात फैसला
"भाजपने शब्द पाळला असता तर महाविकास आघाडीचा जन्म झाला नसता. लाखो लोकांच्या साक्षीने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. आता निवडणुका घ्या, चूक केली असेल तर घरी बसवतील. ठाकरेंची सहावी पिढी महाराष्ट्रासाठी काम करत आहे. घ्या निवडणुका, होऊ द्या जनतेच्या कोर्टात फैसला," असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरील माईक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. शिवाय यावेळी त्यांनी प्रॉम्टिंग देखील केलं. यावरुनही उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. "माझा माईक कधी कुणी खेचला नाही. महाविकास आघाडीमध्ये समन्वय आणि सभ्यता होती," असं ते म्हणाले.
'त्यांची भूकच भागत नाही, आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय'
मलाई खाण्यासाठी मी मुख्यमंत्रिपदी नव्हतो. स्वतःकडे कोणतीही मोठी खाती ठेवली नव्हती. एका मंत्र्याने दिवा लावला म्हणून ते खातं माझ्याकडे आलं होतं. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदार संजय राठोड यांना टोला लगावला. परिवारातले समजून विश्वास ठेवला हीच माझी चूक झाली. त्यांना मुख्यमंत्री केलं असतं तर यांनी काय वेगळं केलं असतं? त्यांची भूकच भागत नाही, आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय. स्वतःची तुलना शिवसेनाप्रमुखांशी करत आहेत, असा आरोप नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर केला. सध्या सुरु आहे ती राक्षसी महत्वाकांक्षा आहे. याला हावरटपणा म्हणतात, अस ठाकरे म्हणाले.