मुंबई : राज्यात अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी करण्यात येत आहे. अशातच, उध्दव ठाकरे यांचा भावी पंतप्रधान म्हणून बॅनर झळकला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. उध्दव ठाकरे यांचे निवास्थान मातोश्रीबाहेर हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत.
उध्दव ठाकरे यांचा 27 जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्त कार्यकर्त्यांकडून मातोश्री बाहेर बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर उध्दव ठाकरे यांचा भावी पंतप्रधान असा उल्लेख करण्यात आलेला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. दरम्यान, राजगडीमधील इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, भाजपविरोधात देशभरातील विरोधी पक्षाची मोट बांधण्यात येत आहे. यासाठी आतापर्यंत विरोधी पक्षांच्या दोन बैठक पार पडल्या. तर, तिसरी बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत 26 पक्षांनी मिळून इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स (INDIA) या नावाने युती करण्याची घोषणा केली आहे. परंतु, अद्यापही विरोधी पक्षांच्या पंतप्रधान पदाचा चेहरा ठरलेला नाही. या मुद्यावरुन भाजपने अनेकदा विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे.