मुंबई : 2024 च्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचा चेहरा असतील, असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकशाहीवर केला आहे. विरोधी एकजुटीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार असून विरोधी पक्षांची मोट बांधणार आहे. तर पंतप्रधान मोदींविरोधात पंतप्रधानपदाचा चेहरा उद्धव ठाकरेच असल्याचे त्यांनी म्हंटले होते.
नेमके काय म्हणाले संजय राऊत?
उध्दव ठाकरे पंतप्रधान पदाचे चेहरा होऊ शकतात. विरोधी पक्षातील भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांचा चेहरा समोर आलेला आहे. परंतु, या क्षणी ते अजूनही बॅकफूटवर खेळत आहे. ते कॉंग्रेसला सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत. नक्कीच कॉंग्रेस पक्षाला त्यामुळे संजीवनी प्राप्त झाली आणि त्यांच्यावर पप्पू हा शिक्का भाजपने लावला होता तो दूर झाला. मोदी आणि त्यांच्या कारस्थानाला राहुल गांधी चांगल्या प्रकारे टक्कर देत आहेत. परंतु, 2024 ला आपल्याला सर्वसमावेशक आणि सर्वमान्य चेहरा स्वीकरावा लागेल आणि त्यासाठी विरोधी पक्षाने एकत्र येऊन बसणे गरजेचे आहे आणि मला असे वाटते पुढच्या महिन्यामध्ये संसद सुरु होईल. यावेळी उध्दव ठाकरे दिल्लीत काही दिवस थांबण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रीय राजकारण करायचे असल्यास दिल्लीत जावे लागते, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे.