मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील शिंदे फडणवीस सरकार मधील मंत्री संजय राठोड यांच्या मतदार संघातील माजी राज्यमंत्री, भाजप नेते, दिग्रसचे माजी आमदार संजय देशमुख यांनी आज उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधले. त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनीही ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी सध्या माझी भुमिका शिक्षकासारखी झाली आहे. कारण बोलणारा मी एक ऐकणारे विद्यार्थी खूप आहेत, असे त्यांनी म्हंटले आहे. यासोबतच ठाण्यात लवकरच सभा घेणार असल्याचेही उध्दव ठाकरेंनी सांगितले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, गेले 2 ते 3 महिने मी मुख्यमंत्री पद सोडलं. तेव्हापासून एकही दिवस असा नाही की लोकं शिवसेनेत येत नाहीत. राजकारणामध्ये संबंध नाही असे लोक, तसेच वेगवेगळ्या धर्माचे लोक आमच्या सोबत येत आहेत. सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की तुम्ही लढा, आम्ही तुमच्यासोबत आहे. प्रत्येकवेळी सांगत आलो की माझं काय होणार, शिवसेनेचं काय होणार हे ठरवणारे तुम्ही आहात. पण, देशाच्या लोकशाहीची काळजी आपल्याला आहे. शिवसेना मजबूत आहे. जुनै शिवसैनिक परत येतायत. स्थानिक पातळीवरील नेते गेले होते. पण, ते परत येतायत. त्यांच्या जाण्याचे काही कारण होते. अन्याय गाडून दाखवणारच, असा निर्धारच उध्दव ठाकरेंनी केला आहे.
सध्या माझी भूमिका शिक्षकासारखी झाली आहे. कारण बोलणारा मी एक ऐकणारे विद्यार्थी खूप आहेत. ज्या ज्यावेळी शिवसेनेवर आघात झाले. तेंव्हा शिवसेना दसपट मोठी होते. ठाण्यात चीडीचूप होईन असे दाखवले गेले. पण, तिथेही चिडून उठले आहे. पोहऱा देवीला मेळावा घ्यायचे जाहीर केले आहे. आता मी ठाण्यात पण घेईल. हा आवाज बुलंद होत आहे. तुम्ही ठाण्यात सभा लावा. तारीख तुम्ही ठरवा. मी आलो म्हणजे समजा, अशी घोषणाही उध्दव ठाकरेंनी केली आहे.
महापालिकेच्या वॉर्ड रचनेबाबत हायकोर्टात सुनावणी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी कोणतेही शहर लोकप्रतिनिधींच्या शिवाय राहाणे योग्य नाही. त्यांना निवडणुक लांबण्याचा प्रयत्न करत आहे. कारण त्यांना आपले काम लोकांच्या मनातून पुसायचे आहे ते होणार नाही, असा आरोप भाजप-शिंदे गटावर केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी ही पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली होती. त्यानंतर प्रचंड राजकीय गोंधळानंतर आता भाजपने आज अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. यावर आज शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. घाईघाईने निवडणूक आयोगाकडे जाऊन आमचं नाव आणि चिन्ह गोठवलं. ठीक आहे पण मी माझं नाव आणि चिन्ह घेऊन पुढे जात आहे. जे गेलेत ते स्वतः लढले नाहीत, भाजपला पुढे केलं. आपण जिंकलेली जागा भाजपच्या पारड्यात टाकली.
मोठा आव आणून अर्ज भरला. त्यानंतर आम्हाला कुणी विनंती करतंय हे पाहिले गेले. मग, कुणाला तरी उभे करून विनंती करवून घेतली. विनंती करा म्हणून विनंती करत फिरत होते. तोंडावर आपटण्यापेक्षा पळालेले बरं पळाले. मग माझं चिन्ह गोठवण्याची घाई का? निवडणूक आयोगाकडे गेले व या बोटावरची थुंकी त्या बोटावर, अशी जोरदार टीका त्यांनी भाजप-शिंदे गटावर केली आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत शिवसेना संपवायची आहे. मला कोणी संपवण्याची भाषा करणार असला तर मी अजून चिडून कामाला लागतो. तुम्हाला काय करायचे ते करा शेवटी शिवसेना जिंकणार आहे, असेही उध्दव ठाकरेंनी म्हंटले आहे.