जळगाव : जालनामध्ये मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सुरू असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. यावर राज्यामध्ये विविध स्तरावरुन संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यावरुन उध्दव ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. जसं जालियनवाला घडलं तसं जालना वाला घडवणारा कोण, असा सवाल उध्दव ठाकरेंनी केला आहे.
जालन्यातील आंदोलकांवर छऱ्याच्या बंदुका वापरल्या. नागरिकांवर बंदुका रोखणं हे हिंदुत्व नाही का? तर भाजपचं हे हिंदुत्व म्हणून भाजपला सोडलं, अशी जोरदार टीका उध्दव ठाकरेंनी केली आहे. तर, संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला न्याय द्या. त्या निर्णयाला पाठिंबा देणारे आम्ही पहिले असणार, असंही उद्धव ठाकरेंनी म्हंटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीला जायला वेळ आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांना जरांगे पाटलांना भेटायला वेळ नाही, असाही निशाणा त्यांनी मुख्यमंत्र्यांवर साधला आहे.
सध्या भाजपमध्ये सगळे आयाराम व कर्तृत्व शून्य लोक. जर शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला हिंदुत्वाची दिशा दाखवली नसती तर आज तुम्ही राजकारणात तळागाळात तुम्ही किती खोल गेला असता हे तुम्हाला कळलं नसतं. भाजपाची दिसेल तिकडे घुसेल, अशी वृत्ती आहे. राज्यात भाजपने आयाराम मंदिर बांधलं पाहिजे, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.