मुंबई : भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरी पाडल्यासंदर्भात वक्तव्य केलं. या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरुन ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शरसंधान साधले आहे. मिंधे यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणवणारे कुणाला जोडे मारणार आहेत ? की स्वतः च स्वतःला, असा निशाणाही उध्दव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला आहे.
काल चंद्रकांत पाटील बाबरीच्या खंदकातून बाहेर पडले. एका मस्तीत चंद्रकांत पाटील बोलतायत. जेव्हा बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात होते. सध्याचे पंतप्रधान पण कुठेच नव्हते. तेव्हा बाळासाहेबांनी जबाबदारी स्वीकारली. बाळासाहेब म्हणाले हे कसले नपुंसक नेतृत्व. आता एक एक बिळातून बाहेर येतायत, असे उध्दव ठाकरेंनी म्हंटले आहे.
भाजपकडे कधीच शौर्य नव्हते. मुंबई दंगलीवेळी पण शिवसैनिक रस्त्यावर लढले. एकीकडे भागवत मशिदीत जातात. आता कव्वालीच्या माध्यमातून प्रचार करणार आहे. सत्तेसाठी लाचारी करणारे मिंधे यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी बाळासाहेबांचे नाव घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मी जेव्हा अयोध्येला गेलो तेव्हा शिवजन्मभूमीची माती घेऊन गेलो होतो. आम्ही कायदा करा म्हणत होतो पण पंतप्रधानांनी हिंमत झाली नाही शेवटी निकाल कोर्टाने दिला. बावनकुळे वगैरे माझ्या खिजगिनतीत पण नाही. पाटील बोलले आहेत. पाटलांची हकालपट्टी व्हायला हवी. ही भाजपची चाल आहे.
ज्यांना कर्तृत्व नसत ते चोरी करतात. मनावर ओझे ठेवून दगड बसवलाय ते सहन होत नाहीए म्हणून त्यांची अवस्था सांगता येत नाही आणि सहनही होत नाही. यांचे गोमूत्र धारी हिंदुत्व. हिंदुत्वाचा बुरखा घातलाय त्यात आत अत्यंत विकृत चेहरा त्यांचा आहे, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.
मिंधेंना बाळासाहेबांचे शिवसेनेचे पवित्र नाव घेण्याचे अधिकार नाही. त्यांनी बाळासाहेबांचा फोटो पण वापरु नये. बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणवणारे कुणाला जोडे मारणार आहेत ? की स्वतः च स्वतःला जोडे मारणार आहेत? त्यांच्या कडून येऊ द्या भाजपच्या कार्यालयात सराव सुरु असेल, असा निशाणाही उध्दव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला आहे.