नागपूर : हिवाळी अधिवेशनात विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी होत आहे. अधिवेशनात शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आले असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच आज दीपक केसरकर आणि उध्दव ठाकरे पहिल्यांदाच समोरासमोर आले. यावेळी त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे विधान भवनात खळबळ उडाली होती.
दीपक केसरकर विधान परिषदेतील कामकाजासंदर्भात उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांच्या दालनात आले होते. यावेळी दीपक केसरकर उपसभापतींच्या दालनातून बाहेर चालले होते, तर उद्धव ठाकरे आतमध्ये प्रवेश करत होते. सत्तांतरानंतर पहिल्यांदा समोर आलेल्या दीपक केसरकर यांना उद्धव ठाकरे यांनी जाब विचारला. तुम्ही असे कसे काय इतके निर्दयीपणे वागू शकता? आम्ही काय वाईट केलंय तुमचं? आम्ही काय कमी दिलं तुम्हाला? आमच्या चौकशा लावता? कार्यालय ताब्यात घेता, असे प्रश्नांची सरबत्तीच त्यांच्यावर केली. यावर दीपक केसरकरांनी तुम्ही अजूनही नाराज आहात का? अशी विचारणा केली. यानंतर दोन्ही नेते आपापल्या मार्गाने निघून गेले.
दरम्यान, उध्दवा ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. मुंबई महापालिकेत मिंधे गट गेला होता. आज तर आरएसएस कार्यालयात गेला होता. ज्यांच्यात कर्तृत्व नसते, स्वत: काही निर्माण करण्याची ताकद नसते ते सरळ सरळ चोऱ्या करतात किंवा दुसऱ्यांच्या गोष्टींचा ताबा घेतात. शेवटी हा मानसोपचार तज्ज्ञांना विचारण्याचा विषय आहे. काहींच्या मनात न्यूनगंड असतो की आपण काही करू शकत नाही. मग, त्या न्यूनगंडाचे रुपांतर अहंगंडात होते. आणि दुसऱ्यांचे नेते, पक्ष, ऑफिस बळकवायचे, अशा शब्दांत उध्दव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.