साताऱ्याच्या लोकसभेच्या जागेवरुन महायुतीच्या उमेदवारीचा तिढा सुटला आहे. साताऱ्यातून अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले यांच्यात थेट लढत होणार आहे.
महायुतीत साताऱ्याच्या जागेवरुन भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद होता. राष्ट्रवादीकडून या जागेवर गावा केला जात होता. परंतू आता साताराच्या जागेवरुन भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे नेते शशिकांत शिंदे यांचाविरुद्ध उदयनराजे भोसले लढणार आहेत. तसेच काही दिवसांपूर्वीच उदयनराजे हे दिल्लीतमध्ये केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याची माहिती मिळाली होती.
उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी भाजपमधून विरोध असल्याची चर्चा होती. तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना उदयनराजेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारांच्या काही याद्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामध्ये उदयनराजेंचे नाव नव्हते. मात्र, आता त्यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झाली आहे. आता उदयनराजे भोसले आणि राजे समर्थक प्रचारालाही लागले आहेत.