मराठा, धनगर आरक्षणाचा विषय सध्या राज्यात सुरु आहे. यावर अनेक जणांच्या राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असतात. खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. खासदार उदयनराजे भोसले, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मराठा आणि धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे.
तसेच धनगर समाजाच्या मागणीनुसार त्यांचे आरक्षण बदलून द्यावे, अशी मागणी दोघांनी पंतप्रधान मोदींकडे केली.या दोन्ही प्रश्नांवर लवकरच सकारात्मक तोडगा काढू अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली असल्याचे समजते. आरक्षणाच्या प्रश्नावर नवी दिल्लीत महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची महत्वपूर्ण बैठक झाली. बैठकीनंतर भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि माढाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
उदयनराजे भोसले यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मराठा आरक्षण विषय गुंतागुंतीचा होत चालला आहे. गरजू मराठा व धनगर समाजाला हक्क मिळवून देणं आणि त्यासाठी कुणाच्याही हक्कावर गदा येऊ न देणं, ही प्राथमिकता असायला हवी, अशी विनंती तमाम महाराष्ट्रीय जनतेतर्फे पंतप्रधान श्री @narendramodi यांना आज केली आहे. लवकरच तोडगा निघेल, अशी आशा आहे.