मुंबई : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत अडचणीत येण्याची शक्यता आहे. सामंत यांनी विधानसभा निवडणूक लढवताना सादर केलेलं प्रतिज्ञापत्र खोटं असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे आता त्यांच्यावर कारवाई होणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
उदय सामंत यांनी 2014 आणि 2019 मध्ये विधानसभा निवडणूक लढवताना प्रतिज्ञापत्रात वाहन खरेदी मूल्य वेगवेगळी दाखवल्याचं उघड झालं आहे. सामंत यांचे वाहन क्रमांक एम.एच. 08:4599 वाहनाची खरेदी किंमत 2014 मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात वाहनाचं खरेदी मूल्य 13 लाख 28 हजार रुपये दाखवले होते. तर याच वाहनाची किंमत सामंत यांनी 2019 मध्ये 14 लाख 16 हजार रुपये दाखवली आहे.
त्याचसोबत कुरणे गावातील शेतजमीनीचे खरेदी मुल्य वेगवेगळी दाखवली आहेत. कुरणे गावातील सर्वे नंबर 334 /अ 338/ 2 ही शेतजमीन सामंत यांनी 2014 मध्ये 17 हजार रुपये खरेदी केल्याचे निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दाखवत आहेत. आणि 2019 साली निवडणूक लढवत असताना सामंत यांनी याच शेत जमिनीची किंमत दहा हजार रुपये या रक्कमेला खरेदी केल्याचे प्रतिज्ञापत्रात दाखवत आयोगाची दिशाभूल केलेली आहे.
दरम्यान, उदय सामंत यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. सामंतांवर टिळकनगर इंडस्ट्रीज कंपनीला बेकायदा सबसिडी दिल्याचा आरोप केला जात आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे गटानं सामंत यांना लक्ष्य केलं आहे.